अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. पहिल्या दोन भागांच्या प्रचंड यश आणि दमदार कथेनंतर तिसऱ्या भागात त्याच्या एंट्रीने कथा आणखीनच रंजक होणार आहे.
या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जयदीप अहलावत डिसेंबर 2025 मध्ये कलाकारांमध्ये सामील झाल्यानंतर, आता प्रकाश राजच्या प्रवेशाने स्टारकास्ट आणखी मजबूत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राज यांना ‘दृश्यम 3’ची स्क्रिप्ट आणि त्याचे पात्र लगेचच आवडले, त्यानंतर त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला.
विशेष म्हणजे तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार नाही, तर एका नव्या आणि महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे, ज्यामुळे कथेत मोठा ट्विस्ट येणार आहे. स्टार स्टुडिओ 18 आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत.
चित्रपटाचे लेखन अभिषेक पाठक, अमिल केन खान आणि परवेझ शेख यांनी केले आहे, तर आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. नुकतेच प्रकाश राज यांनी स्वतः स्पिरीट चित्रपटाबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या. ‘दृश्यम 3’ 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
