मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (८२) यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कलमाडी यांना काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मागे संपूर्ण कुटुंब सोडले आहे. पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील कलमाडी हाऊसमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश कलमाडी यांचा जन्म ०१ मे १९४४ रोजी झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते हवाई दलात पायलट होते. राजकारणात आल्यानंतर ते 1982 ते 1996 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी 1996 आणि 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. राजकारणाशिवाय सुरेश कलमाडींनी क्रीडा विश्वातही आपला ठसा उमटवला. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल आणि पुणे मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला जगभरात ओळख मिळवून दिली. ते प्रदीर्घ काळ पुण्याचे खासदार होते.
त्यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदही भूषवले. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षही होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. मात्र, याच राष्ट्रकुलमध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये त्यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले होते. यानंतर पुण्याचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट 15 वर्षांनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात सादर केला.
त्यात सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आली होती. या निर्णयानंतर कलमाडींच्या समर्थकांनी पुण्यात जल्लोष केला. मात्र हा निर्णय येईपर्यंत कलमाडींची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपली होती. ते काही काळापासून आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
