अहिल्यानगर, पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत थंडी वाढण्याची शक्यता

मुंबई गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली असून, त्यामुळे गुलाबी थंडी वाढली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर भारतातून थंड हवेचा प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत किमान तापमान 16 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोमवारी हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात 22.2 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रावर 18.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळमध्ये झाली. तेथे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यानंतर गोंदियात ९ अंश सेल्सिअस, अमरावतीत ९.६ अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये ९.९ अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये ९ अंश सेल्सिअस, जळगावमध्ये ९.४ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगरमध्ये ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहिल्याने या भागात सर्वाधिक थंडी जाणवणार आहे.

अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version