प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दमदार अभिनय आणि सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल स्मिथने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्याबद्दल त्याने बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी आधीच बोलले आहे, असे त्याने उघड केले. एवढेच नाही तर, विलने असेही सांगितले की, त्याने थेट शाहरुख खानला चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली आहे.
अलीकडेच, दुबईत त्याच्या नॅशनल जिओग्राफिक शो ‘पोल टू पोल विथ विल स्मिथ’ च्या प्रीमियरपूर्वी दिलेल्या मुलाखतीत विलने सांगितले की, तो सलमान खानला भेटला होता आणि दोघांमध्ये काही कल्पनांवरही चर्चा झाली होती.
याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल बोलताना ते म्हणाले की, बिग बींनी त्यांना गंमतीने ‘बिग डब्ल्यू’ म्हटले होते, त्यानंतर दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग झाली होती. शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करताना विल स्मिथने सांगितले की, गेल्या काही वर्षांत मला अनेक ऑफर आल्या, पण कोणताही प्रकल्प पुढे सरकू शकला नाही.
यानंतर त्याने खुलासा केला की त्याने थेट शाहरुख खानला चित्रपटात कास्ट करण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे, विल स्मिथ याआधीच बॉलिवूडशी जोडला गेला आहे आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटातील एका गाण्यात टायगर श्रॉफसोबत कॅमिओ करताना दिसला होता.