मुंबई पुणे जिल्ह्यातील इंदापूर बसस्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसला अचानक आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 50 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली. घटनेचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पथक करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस पुण्याहून धाराशिवच्या दिशेने जात होती. इंदापूर बसस्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर काल रात्री 2.10 वाजण्याच्या सुमारास चालकाने ही बस काही वेळासाठी उभी केली होती, त्यादरम्यान बसला अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला. प्रवाशांनी कसातरी जीव वाचवला.
अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने आग आटोक्यात आणली मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसला आग इंधन गळतीमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज असून, सध्या तपास सुरू आहे.