मुंबई दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील एका चाळीला सोमवारी भीषण आग लागली. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेत एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाजवळील मच्छिमार नगरमध्ये असलेल्या एका चाळीला भीषण आग लागली. चाळीच्या पहिल्या मजल्यावरील विजेच्या तारा, विद्युत उपकरणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी व कपडे, भांडी आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या महापालिकेच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॉलनीत आग पसरण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मच्छिमार नगर ही कफ परेड आणि नरिमन पॉइंटच्या उंच इमारतींना लागून असलेली मासेमारीची वसाहत आहे. यश विशाल खोटे (१५) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये विराज खोटे (13), संग्राम कुरणे (25) आणि देवेंद्र चौधरी (30) यांचा समावेश आहे. यापैकी चौधरी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. विराज खोटे आणि संग्राम कुरणे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.