मुंबई जालना जिल्ह्यातील शेवगा गावात सोमवारी एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मौजेपुरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेवगा गावातील शेतकरी रामेश्वर खंडागळे यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेला असल्याची माहिती आज गावकऱ्यांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह झाडावरून खाली आणला. यानंतर मृताच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली, जी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती यावर्षी बिकट झाल्याचे लिहिले आहे. शेतीमालाचे नुकसान झाल्याने उत्पन्न नाही. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पन्नाअभावी हातात पैसे नाहीत. दिवाळी आली, मुलांनी कपडे, फटाक्यांसाठी पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नाहीत, त्यांना काय सांगू? अनुदान आले असते तर दिवाळी साजरी झाली असती. मला माफ करा, मी जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.