मुंबईत रविवारी दोन ठिकाणी झालेल्या सिलेंडर स्फोटांनी मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना अंधेरी पूर्व येथे घडली. अंधेरी येथील रमाबाई नगर, मरोळ येथे गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य झोपले असताना गॅस संपूर्ण घरात पसरला होता. सकाळी उठल्यानंतर लाईट चालू करताच अचानक ठिणगी निर्माण झाली आणि अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर घराला आग लागली.
दुसरी घटना दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे घडली. कुलाबा सोशल नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली असून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत सुनील सिंग (28) आणि सुब्रता बराई (35) हे जखमी झाले. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनील सिंग हे 5 टक्के तर सुब्रत बाराई हे 15 टक्के भाजले आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.