मुंबई ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रदेश भाजप शुक्रवारी राज्यात 15 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी मुंबईत दिली. केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
रवींद्र चव्हाण गुरुवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे वंदे मातरम लक्षात घेऊन सरकारने या गीताची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. याअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाण्यात, वनमंत्री गणेश नाईक रायगडमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तसेच पुण्यातील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यात, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन जळगावात, पणन मंत्री जयकुमार रावल धुळ्यात, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच कुलाबा (मुंबई) येथील कार्यक्रमाला बहुजन मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार असून सायन येथे आयोजित कार्यक्रमात प्रसाद लाड, योगेश सागर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रदेश भाजप कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.