मुंबई : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून काल रात्री नाशिकरोड स्थानकाजवळ पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथक या घटनेचा तपास करत आहेत.
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी रविवारी सांगितले की, कर्मभूमी एक्स्प्रेसमधून तीन तरुण पडल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक माळी आणि कॉन्स्टेबल भोळे यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले. भुसावळकडे जाणाऱ्या ट्रॅकवर 190/1 ते 190/3 या किलोमीटर दरम्यान दोन तरुणांचे मृतदेह आणि एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. जखमी तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृत आणि जखमी तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते, त्यामुळे दाराजवळ उभ्या असलेल्या तरुणांचा गर्दीमुळे तोल गेला आणि तो पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे तरुण बिहारमधील त्यांच्या गावी सण साजरा करण्यासाठी की विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जात होते, याचा तपास सुरू आहे.