मुंबई. दहिसर-भाईंदर लिंक रोडला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मुंबई महापालिका 2,337 कोटी रुपये खर्चून हा लिंक रोड बांधणार आहे. साडेतीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दहिसर ते भाईंदर हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. सध्या दहिसरहून भाईंदरला जाण्यासाठी एक तास लागतो.
दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्प हा कोस्टल रोड प्रकल्पाचा शेवटचा टप्पा आहे. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सहा पॅकेजमध्ये विभागलेला आहे. यामध्ये दहिसर-भाईंदर लिंक रोड हा शेवटच्या ‘एफ पॅकेज’पासून सुरू होतो, जो गोराई ते दहिसरला जोडतो. दहिसरमधील हा एलिव्हेटेड कॉरिडॉर कंदरपाडा मेट्रो स्टेशनजवळील लिंक रोड (दहिसर पश्चिम) येथून सुरू होईल आणि भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस गार्डनजवळ संपेल. दहिसर-भाईंदर लिंक रोड खारफुटीची जंगले, दहिसर खाडी आणि खारफुटीच्या जमिनींसह अनेक कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) संरक्षित क्षेत्रांमधून जाईल. दहिसर ते भाईंदरमध्ये सुमारे 10 किलोमीटरचे अंतर आहे.
हा मार्ग गजबजलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जातो. या लिंक रोडमुळे दहिसर चेक नाका सारख्या गजबजलेल्या जंक्शनला बायपास करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. आवश्यक वैधानिक परवानग्या मिळविण्यासाठी सुरुवातीचे सहा महिने ठेवले आहेत. सध्या बीएमसी पर्यावरण मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण गतीने सुरू होईल.